
पुणे / गडचिरोली (विशेष प्रतिनिधी) | २२ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी हॉटेल ब्ल्यू वॉटर (पुनावळे, पिंपरी-चिंचवड, पुणे) येथे अत्यंत उत्साहात पार पडली. संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेतील प्रमुख निर्णय आणि महत्त्वाच्या चर्चा:
खेळाडूंचे अभिनंदन व गौरव: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कुस्तीगीरांचे सभेत अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र केसरी’ स्पर्धांचे नियोजन: आगामी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘महाराष्ट्र केसरी महिला’ किताब लढतींच्या आयोजनाबाबत विस्तृत चर्चा झाली.
वयोगटनिहाय स्पर्धांची आखणी: सन २०२६-२७ या वर्षासाठी १५, १७ व २० वर्षांखालील फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन आणि महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांचे नियोजन करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
’मिशन लक्ष्यवेध’ योजना: महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेचा कुस्तीगीरांना अधिक लाभ कसा मिळवून देता येईल, यावरही सविस्तर मंथन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी: आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील मल्लांचा प्रभावी सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला
या वार्षिक सभेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. संदीपभाऊ भोंडवे, सरचिटणीस श्री. योगेशजी दोडके, विदर्भ अध्यक्ष श्री. तिरतकर साहेब, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री. धर्मशिक काटकर यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी अध्यक्ष श्री. रामदासजी तडस यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राला अधिक गती देणे आणि खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या निर्धारासह सभेची सांगता झाली.






