
गडचिरोली (विशेष प्रतिनिधी): आरोग्य सेवेत फार्मासिस्टचे योगदान अनमोल असून बदलत्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आजच्या फार्मासिस्टने तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे (GDCDA) माजी अध्यक्ष अनिल गोगुलवार यांनी केले. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (GDCDA) आणि एम. एस. कोवासे कॉलेज ऑफ फार्मसी, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भव्य जनजागृती रॅलीने झाली सुरुवात सकाळी १० वाजता स्थानिक केमिस्ट भवन येथे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक एकत्र आले. चहा-नाश्त्यानंतर विद्यार्थ्यांनी पांढरा ॲप्रन परिधान करून आणि हातात आरोग्य जनजागृतीपर घोषवाक्यांचे फलक घेऊन शिस्तबद्ध रॅली काढली. केमिस्ट भवन येथून निघालेली ही रॅली इंदिरा गांधी चौकापर्यंत पोहोचली. चौकात काही काळ थांबून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली व त्यानंतर रॅलीचा समारोप पुन्हा केमिस्ट भवन येथे झाला. मुरखळा येथे मुख्य सोहळा व धन्वंतरी पूजन रॅलीनंतर मुख्य कार्यक्रम एम. एस. कोवासे फार्मसी कॉलेज, मुरखळा येथे आयोजित करण्यात आला. मंचावर GDCDA चे अध्यक्ष देवेंद्र सोमणकर, माजी अध्यक्ष अनिल गोगुलवार, कोषाध्यक्ष चंद्रशेखर बुद्धे, उज्वल फार्माचे संचालक विजय देवकुले तसेच कोवासे फार्मसी कॉलेजचे विभागप्रमुख (HOD) प्रा. डोईजड सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी व्यावसायिक कर्तव्याची ग्वाही देणारी ‘फार्मसी ओथ’ (शपथ) ग्रहण केली. विजय देवकुले, चंद्रशेखर बुद्धे आणि प्रा. डोईजड यांनी उपस्थितांना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. साथरोगांच्या काळात फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची : देवेंद्र सोमणकर GDCDA चे अध्यक्ष देवेंद्र सोमणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या धावपळीच्या युगात समाजाला फार्मासिस्टची नितांत गरज आहे. भविष्यात कोणती साथ किंवा आजार समोर येईल याचा नेम नाही, हे कोरोनाच्या महामारीने जगाला दाखवून दिले आहे. अशा संकटसमयी फार्मासिस्ट अग्रभागी राहून सेवा बजावतो. यावेळी त्यांनी फार्मसी शिक्षणातील विविध संधी व करिअरविषयी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. AMR विरोधातील लढ्यात फार्मासिस्टची मोठी जबाबदारी : अनिल गोगुलवार अध्यक्षीय भाषणात बोलताना अनिल गोगुलवार यांनी स्पष्ट केले की, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (PCI) सुरू केलेल्या ‘अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स’ (AMR) अभियानात फार्मासिस्टचे योगदान निर्णायक ठरणार आहे. गरज नसताना किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक औषधांचा होणारा अतिवापर थांबवणे गरजेचे आहे. अँटिबायोटिक्सचा अनिर्बंध वापर कसा रोखता येईल आणि पुढील पिढ्यांसाठी ही औषधे कशी परिणामकारक राहतील, यासाठी फार्मासिस्टने जागरूक राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोवासे फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले. राष्ट्रवंदनेनंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील औषध विक्रेते, GDCDA चे सर्व पदाधिकारी, फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात;




