
गडचांदूर : बनावट कागदपत्रे, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात तब्बल दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गडचांदूर पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. पुण्यात चार दिवस शोधमोहीम राबविल्यानंतर आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुंबई विमानतळ परिसरात सापळा रचून २४ नोव्हेंबर २०२६ रोजी ही कारवाई केली. DRDO च्या ठेक्याचे आमिष दाखवून फसवणूक समीर मन्सूर मुल्ला (वय ४४, रा. पोर्वाल रोड, लोहगाव, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) येथे पुरातन रासायनिक वस्तू खरेदी करण्याचा मोठा ठेका मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. यासाठी बनावट कागदपत्रे, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ९०/२०२५ अन्वये भादंवि कलम ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४६७, ४७१, ४७२ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता. पुण्यात चार दिवस शोध, मुंबईत आरोपी जेरबंद आरोपी पुण्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गडचांदूर पोलिसांचे पथक तातडीने पुण्यात दाखल झाले. सलग चार दिवस विविध ठिकाणी शोध घेऊनही आरोपीचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, तो मुंबईमार्गे विमानाने दिल्लीला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ मुंबई गाठली. विमानतळ परिसरात शोधमोहीम राबवून आरोपी समीर मुल्ला याला ताब्यात घेण्यात आले. पुणे ते मुंबईदरम्यानच्या शोधकार्यासह पोलिसांनी केलेल्या एकूण सुमारे दोन हजार किलोमीटरच्या ये-जा प्रवासातून या मोहिमेची व्याप्ती स्पष्ट झाली. न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर कोरपना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव गोडे करीत आहेत. या तपासातून फसवणुकीच्या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची कामगिरीपोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रमोद बनबले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव गोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाळोकर (सायबर सेल, चंद्रपूर), पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकड, पोलीस हवालदार बलवंत शर्मा, कार्तिक खांके (सायबर सेल, चंद्रपूर), पोलीस अंमलदार सूरज ढोले, प्रकाश बाजगीर तसेच डीबी पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, गोपनीय माहितीच्या आधारे आखलेली रणनीती आणि पुणे-मुंबईदरम्यान केलेली धावपळ यामुळे ही कारवाई झाली



दीड वर्षांपासून फरार फसवणुकीच्या आरोपीला









