गडचिरोली : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या नियमित आणि कंत्राटी ग्रामसेवकांकडून एका सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्याला आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी प्रत्येकी ३,००० रुपयांची सक्तीची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘लढा निधी’च्या नावाखाली गोळा केला जाणारा हा संपूर्ण पैसा एका कंत्राटी ग्रामसेविकेच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होत असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली असून, या प्रकारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. वेतन काढण्यासाठी लाच द्यावी लागते? ऑडिओ क्लिपमुळे वाद पेटला शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन हे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. मात्र, आर्मोरी पंचायत समितीत संघटनेच्या आडून हा बेकायदेशीर वसुलीचा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे. एका ग्रामसेवकाच्या संभाषणाची (ऑडिओ क्लिप) ऑडिओ क्लिप समोर आल्याने या प्रकरणातील गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. कंत्राटी व नियमित ग्रामसेवकांचे रखडलेले वेतन काढण्यासाठीच हे ३,००० रुपये जमा करावे लागत असल्याचे या संभाषणातून स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ, ग्रामसेवकांच्या हक्काचा पगार करून घेण्यासाठी दरमहा किंवा ठराविक वेळी पैशांची देवाणघेवाण केली जाते. या गंभीर प्रकरणामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) पंकज भोईर देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.निष्पक्ष आणि सखोल चौकशीची वाढती मागणी “हे ३,००० रुपये दिल्याशिवाय ग्रामसेवकांचे पगार काढले जात नाहीत का?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. ज्या संघटनेच्या नावावर हा ‘लढा निधी’ जमा केला जात आहे, ती संघटना मुळात शासनमान्य आहे का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही संघटनेला अशा प्रकारे निधी गोळा करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना, केवळ एका सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्याच्या फायद्यासाठी हा वसुलीचा फंडा शोधून काढण्यात आल्याचा आरोप होत आहे. शासकीय निधीचा किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा असा गैरवापर करणे हा थेट भ्रष्टाचाराचा भाग मानला जातो. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी आता कर्मचारी आणि सुजाण नागरिकांमधून होत आहे. संबंधित कंत्राटी ग्रामसेविकेच्या बँक खात्याचे ‘बँक स्टेटमेंट’ तपासल्यास या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो, ज्यामुळे शासकीय यंत्रणेला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर येईल.










