
गडचिरोली, दि. ३० (विशेष प्रतिनिधी):निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या मतदार नोंदणी व एस.आय.आर. (SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ पाहता संपूर्ण एस.आय.आर. प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आज गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विरोधी पक्षांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन करण्यात आले.भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपाई) आणि बहुजन समाज पार्टी (बीआरएसपी) या पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. सध्या सुरू असलेल्या एस.आय.आर. प्रक्रियेबाबत यावेळी तीव्र शब्दांत विरोध दर्शविण्यात आला. नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या मूलभूत हक्कापासून जाणीवपूर्वक वियोजित करण्याचे मोठे षडयंत्र निवडणूक आयोगाकडून रचले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. या संपूर्ण गोंधळाला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच थेट जबाबदार असल्याने त्यांना तातडीने पदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. महेश कोपुलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव देवराव चौडे, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम रामटेके आणि विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोळे यांनी केले.यावेळी आंदोलनात प्राचार्य प्रकाश दुधे, प्रल्हाद रायपुरे, नीता सहारे, वनमाला झाडे, सुनिता रायपुरे, कल्पना रामटेके, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, मीनाक्षी सेलोकर, रामभाऊ काळबांधे, रमेश टेकाम, विठोबा साखरे, प्रकाश खोब्रागडे, चुन्नीलाल माटघरे, रोहिदास फुलझेले, लहुजी रामटेके, केवळराम नागोसे, वसंत गेडाम, प्रशांत कोपुलवार, सुरेश बारसागडे यांच्यासह तीनही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी माननीय राष्ट्रपती व माननीय पंतप्रधान महोदयांच्या नावे लिहिलेले सविस्तर लेखी निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार





