
आरमोरी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कोजबी आणि देवुळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल १ कोटी ४९ लाख ५ हजार ८७१ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या (BRSP) वतीने राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांकडे ९० पुराव्यांच्या पत्रांसह तक्रार दाखल करण्यात आली आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी मुंबई येथील मंत्रालयात हे निवेदन सादर केले असून, दोषींवर तात्काळ निलंबनाची व फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. २० वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहून गैरव्यवहार
तक्रार निवेदनानुसार, कोजबी ग्रामपंचायतीत एकच ग्रामसेवक तब्बल २० वर्षांपासून (सन २००५ पासून) सलग कार्यरत आहे. वरिष्ठ अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ग्रामनिधी, ग्रामपाणी पुरवठा निधी, १२ वा, १३ वा, १४ वा व १५ वा वित्त आयोग, मागास क्षेत्र अनुदान निधी (BRGF), दलित वस्ती सुधार योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तात्काळ निलंबन व उच्चस्तरीय चौकशीची मागणी
मागील २२ वर्षांपासून एकाच पंचायत समितीत आणि २० वर्षांपासून एकाच ग्रामपंचायतीत काम करत असलेल्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा दबाव असल्याने ही चौकशी दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम १९६४’ नुसार संबंधित दोषींना तात्काळ निलंबित करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व गंभीर स्वरूपाचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी (पोलीस) गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी बी.आर.एस.पी.चे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केली आहे.








