
गडचिरोली:नगर परिषदेच्या हक्काच्या व गहाण असलेल्या भूखंडावर बेकायदेशीर पक्के बांधकाम केल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप नगरसेविका तथा महिला व बालकल्याण उपसभापती शिल्पा अंकित हेमके (शिल्पा उद्धवराव गव्हारे) यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने (BRSP) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या तक्रार पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.गहाण भूखंडावर अनधिकृत बांधकाम: मौजा गडचिरोली येथील सर्व्हे क्र. ११/१ ‘क’ मधील खुल्या जागेवर रहिवासी वापरासाठी अकृषक (NA) प्लॉट पाडून त्यांची विक्री करण्यात आली होती. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक टाऊनशिप अधिनियम १९६५ च्या कलम ४४ मधील तरतुदींनुसार, रस्ते, भूमिगत गटार, पथदिवे व सुशोभीकरण यासारख्या मूलभूत नागरी सुविधांची पूर्तता होईपर्यंत भूखंड क्र. ६६ नगर परिषदेकडे गहाण (राखीव) ठेवण्यात आला होता.परवानगीशिवाय बांधकाम: नियमानुसार विकास पूर्ण होऊन गहाणखत सुटण्यापूर्वीच, नगर परिषदेची कोणतीही इमारत बांधकाम परवानगी अथवा मंजूर नकाशा उपलब्ध नसताना या राखीव भूखंडावर पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले.सातबाऱ्यावर थेट सहभाग: सदर भूखंडाच्या सातबाऱ्यावरून भाजप नगरसेविका शिल्पा हेमके व त्यांचे पती अंकित हेमके यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून नगरसेविका शिल्पा हेमके यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरवावे आणि शासकीय जागेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.






