
गडचिरोली (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची गडचिरोली जिल्हा शाखेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. चामोर्शी रोडवरील चांदेकर बिल्डिंग येथील जिल्हा कार्यालयात आज, २७ सप्टेंबर रोजी आयोजित या बैठकीत पक्षाचा अजेंडा घराघरापर्यंत पोहोचवण्याचा तसेच आगामी हिवाळी अधिवेशनावर गडचिरोलीतून ५०० लोकांचा मोर्चा नागपूरला नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीला विदर्भ अध्यक्ष तथा संयोजक मा. विशेष फुटाणे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर पक्षाची भूमिका यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी काळात आक्रमक रणनीती आखून पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोडे यांनी केले. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर जनतेच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यातून किमान ५०० कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होतील, अशी घोषणा या बैठकीत करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. जनबंधू, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम रामटेके, मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष इम्रान सय्यद, तालुकाध्यक्ष बांबोडे, शहराध्यक्ष आकाश बांबोडे, पक्षाचे महासचिव अरविंद वाळके, ज्येष्ठ नेते विलास कुंभारे, ज्येष्ठ प्रवक्ते राजभाऊ भगत, चंद्रप्रकाश गेडाम, युवा अध्यक्ष वैभव दरडे, तुषार रामटेके, बंडू वाघमारे, चंद्रकांत रायपुरे, मिथुन गेडाम यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी




