
गडचिरोली : देशभरात ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या औषध विक्रीच्या निषेधार्थ बुधवारी (२० मे) पुकारण्यात आलेल्या ‘ऑल इंडिया केमिस्ट बंद’ला गडचिरोली जिल्ह्यात उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला. गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील मेडिकल व्यावसायिकांनी आपली दुकाने एक दिवस बंद ठेवून सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शहरात मूक मोर्चा आणि घोषणाबाजी : आंदोलनाचा भाग म्हणून गडचिरोली शहरातील केमिस्ट भवन येथून एका मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत इंदिरा गांधी चौकात पोहोचला.
निषेध आंदोलन : इंदिरा गांधी चौकात जमा झालेल्या मेडिकल व्यावसायिकांनी सरकारच्या ऑनलाइन औषध विक्री धोरणाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
व्यापकांचा सहभाग : या आंदोलनात एकट्या गडचिरोली तालुक्यातील सुमारे ७५ औषध विक्रेते सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्येही दुकानदारांनी कडकडीत बंद पाळून या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला.ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ: व्यावसायिकांचे गंभीर आरोप आंदोलनादरम्यान केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मेडिकल व्यावसायिकांनी ऑनलाइन औषध विक्रीच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला औषध हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि अधिकृत केमिस्टच्या देखरेखीशिवाय औषधांचा वापर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. चुकीची व मुदतबाह्य औषधे: ऑनलाइन मागवलेल्या औषधांमध्ये अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार औषधे न मिळता वेगळ्याच घटकांची (कंपोजीशन) औषधे दिली जातात. तसेच याद्वारे नकली आणि मुदतबाह्य (Expired) औषधे ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत.
गैरवापराची भीती : ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रतिबंधित औषधांची सहज उपलब्धता होत असल्याने, तरुणाईमध्ये त्यांचा गैरवापर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
छोट्या व्यावसायिकांवर रोजगाराचे संकट :केमिस्ट चालकांनी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांवरही निशाणा साधला. मोठ्या व्यावसायिक कंपन्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भरघोस सवलती देऊन किरकोळ मेडिकल दुकानदारांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत असून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंदोलकांची प्रमुख मागणी : जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखवून हा बंद यशस्वी केला. सरकारने सर्वसामान्य रुग्णांचे आरोग्य आणि किरकोळ व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन ऑनलाइन औषध विक्रीवर तातडीने कठोर निर्बंध लादावेत किंवा त्याबाबत ठोस धोरण जाहीर करावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी शेवटी केली.


ऑनलाइन औषध विक्रीविरोधात गडचिरोलीत केमिस्टचा








