
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समितीअंतर्गत कोजबी आणि देवुळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ९ कोटी ४९ लाख ५ हजार ८७१ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने (जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) १५ दिवसांत सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भ्रष्टाचाराचा आरोप: बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मिलींद बांबोळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विविध शासकीय योजनांच्या निधीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा गैरव्यवहार झाला आहे. २० वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत: कोजबी ग्रामपंचायतीत एकच ग्रामसेवक सन २००५ पासून सलग २० वर्षे कार्यरत असून, प्रशासकीय दबावाचा वापर करून हा आर्थिक गैरव्यवहार दाबून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.फौजदारी कारवाईची मागणी: संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.१५ दिवसांची मुदत: तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन शाखेने या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून पुढील १५ दिवसांत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.








