
गडचिरोली: आज दिनांक १० जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे आपल्या बँकेच्या शाखेचा ८ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मंचावर बँकेचे संचालक श्री. अनिलजी गोविंदानी आणि श्री. सचिनजी कुहीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून लीड बँक मॅनेजर श्री. प्रशांतजी बोधरे, गड़चिरोली नागरी सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक श्री. पोटवार साहेब, खादी व ग्रामोद्योग बोर्डाचे (KVIB) विभाग प्रमुख श्री. भास्कर मेश्राम आणि नगरसेवक श्री. सतीशभाऊ विधाते उपस्थित होते.
कर्ज योजनांचे विमोचन
वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या वतीने विविध शासकीय आणि अनुदान पात्र कर्ज योजनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या योजनांची सविस्तर माहिती खादी विकास व ग्रामोद्योग बोर्डाचे प्रमुख श्री. भास्कर मेश्राम आणि बँकेचे महाव्यवस्थापक श्री. श्रीकांतजी वनकर यांनी उपस्थितांना दिली.
बँकेची प्रगती
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक श्री. अनिलजी गोविंदानी यांनी बँकेच्या विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच गेल्या ८ वर्षांत बँकेने आणि विशेषतः गडचिरोली शाखेने केलेल्या प्रगतीचा आलेख मांडत बँकेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित मान्यवर, ग्राहक आणि हितचिंतकांचे आभार शाखा व्यवस्थापक श्री. सचिन चोलूरवार यांनी मानले. या दिमाखदार सोहळ्याला ग्राहकांची मोठी उपस्थिती लाभली होती.










