
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार बाहेरील डॉक्टरांकडे न सोपवता स्थानिक अनुभवी डॉक्टरांचीच जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोळे यांनी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थानिक जिल्ह्याव्यतिरिक्त लगतच्या चंद्रपूर, भंडारा तसेच शेजारच्या छत्तीसगड राज्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. हे रुग्ण प्रामुख्याने माडिया, गोंडी, तेलगू, छत्तीसगडी व बंगाली अशा विविध भाषा बोलणारे असून दुर्गम भागातील बहुभाषिक आहेत. त्यामुळे येथील स्थानिक परिस्थिती आणि भाषांचा परिचय असलेल्या तसेच गेली १२ ते १५ वर्षे या भागात रुग्णसेवेत सक्रिय असलेल्या ज्येष्ठ स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती करणे गरजेचे आहे, जेणेकरून रुग्णांना योग्य दिलासा मिळू शकेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. माता व बालमृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांच्या फेरबदलाची मागणी गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालय जोडण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टरांची टीम गडचिरोली महिला रुग्णालयाच्या नियमित सेवेसाठी नियुक्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, गडचिरोली महिला रुग्णालयातील कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती अहेरी येथील महिला रुग्णालयात करण्यात यावी, जेणेकरून दक्षिण गडचिरोली भागातील महिला व बालमृत्यू रोखण्यास मोठी मदत होईल, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही पुढील पाठपुराव्यासाठी सादर करण्यात आले असून शासनाने यावर गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती मिलिंद बांबोळे यांनी केली आहे.






