
गडचिरोली: येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस स्थानकाजवळील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात खासगी बस उभी करू नये, असा स्पष्ट इशारा स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. मात्र, चालकाने या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुन्हा त्याच ठिकाणी बस उभी केल्याने संतप्त नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत आपला संताप व्यक्त केला.
गडचिरोली एसटी आगारासमोरील मुख्य रस्त्यावर आष्टी–गडचिरोली–वडसा–साकोली–गोंदिया मार्गावर धावणारी ही खासगी बस (क्रमांक MH 33 T 7083) थेट ‘नो पार्किंग’ झोनमध्ये उभी करण्यात आली होती. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांसह शालेय बस आणि दैनंदिन प्रवाशांची वाहतूक पूर्णपणे खोळंबून मोठी कोंडी निर्माण झाली.
काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी संबंधित खासगी बसचालकाला या ठिकाणी वाहन उभे न करण्याची समज दिली होती. तरीही चालकाने मनमानी करत पुन्हा नियम मोडल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी चांगलेच आक्रमक झाले. मोठ्या संख्येने जमा झालेल्या नागरिकांनी बसभोवती गर्दी करत चालकाच्या या मुजोरीचा तीव्र निषेध नोंदवला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
एसटी स्थानकाच्या अगदी बाहेर होणाऱ्या या बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता अरुंद होऊन पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इशाऱ्यानंतरही नियम पायदळी तुडवणाऱ्या या खासगी बसचालकावर गडचिरोली वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) तात्काळ कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.











