
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील निमगाव येथे पंचशील ध्वज हटविण्याच्या प्रकरणावरून रिपब्लिकन पक्षाने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत धानोरा तहसीलदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निमगावला भेट देऊन बौद्ध समाजबांधवांशी संवाद साधला. तसेच संबंधित ध्वजस्थळाची पाहणी करून प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदविला. निमगाव येथील बौद्ध समाजबांधव मागील पाच ते सहा वर्षांपासून गावालगतच्या मोकळ्या शासकीय जागेवर पंचशील ध्वजाची स्थापना करून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत होते. या ठिकाणी ध्वज असल्यामुळे कोणालाही अडचण निर्माण होत नव्हती. सदर जागा बौद्ध समाजाला अधिकृतपणे मंजूर करण्यात यावी, अशी मागणीही समाजाच्या वतीने महसूल प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली होती. मात्र, धानोरा तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात अचानक कारवाई करून पंचशील ध्वज हटविला. या कृतीमुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्रशासनाने योग्य प्रक्रिया न राबविता घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत संबंधित तहसीलदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडू नये, यासाठी बौद्ध समाजबांधवांनी संयम बाळगून शांतता व सलोखा कायम ठेवावा, असे आवाहनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, जिल्हा उपाध्यक्ष दुर्योधन सहारे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे उपस्थित होते. तसेच बौद्ध समाजाचे पदाधिकारी लालाजी वासनिक, प्रशांत नगराळे, राहुल वासनिक, गुलाब हुमणे, लोकमित्र बारसागडे, भगवान खोब्रागडे, विनोबा रामटेके, रोशन रामटेके, केशव खोब्रागडे, महिला मंडळाच्या शीतल मेश्राम, कल्पना खोब्रागडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.











